महिला बचत गटांचे कर्ज माफ करा, अन्यथा २९ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; प्रशासनाला इशारा
By गौतम वाघ
महिला बचत गटांचे कर्ज माफ करा, अन्यथा २९ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; प्रशासनाला इशारा
जालना / प्रतिनिधी: दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी महिलांचा आणि कुटुंबांचा संसार चालवणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत महिला बचत गटांच्या डोक्यावर असलेले बँकांचे कर्ज फेडणे शक्य नाही. तरीही विविध बँकांकडून घराघरात जाऊन सक्तीने कर्ज वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, महिला बचत गटांची कर्जवसुली तात्काळ थांबवून कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी लोकजागरच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सक्तीच्या कर्जवसुलीवर संताप
मीडियाशी बोलताना प्रतिनिधींनी सांगितले की, कोणत्याही महिला शेतकरी किंवा बचत गट सदस्यांची कर्ज बुडवण्याची प्रामाणिक इच्छा नसते. परिस्थिती अनुकूल असताना त्या वेळेवर हप्ते फेडतात. मात्र, चालू वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे व दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनानेच दुष्काळ जाहीर केला असून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये अशा सूचना असतानाही, बँका मात्र महिलांच्या घरी जाऊन सक्तीने कर्जवसुली करत आहेत.
कर्जमाफीची प्रमुख मागणी
ज्याप्रमाणे शासनाने शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली, त्याच धर्तीवर शेतीपूरक व्यवसाय आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी महिला बचत गटांना दिलेले कर्जही पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
२९ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण
बँकांची सक्तीची कर्जवसुली तात्काळ न थांबल्यास आणि कर्जमाफीबाबत योग्य निर्णय न झाल्यास २९ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर पीडित महिलांच्या उपस्थितीत लाक्षणिक साखळी उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस पूर्णपणे शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही लोकजागरच्या वतीने दिला आहे.



