पारध येथे श्रद्धा व भक्तीचा संगम: पराशर महाराज मंदिरात दिव्यांच्या साक्षीने रंगला दीपोत्सव!
By तेजराव दांडगे

पारध येथे श्रद्धा व भक्तीचा संगम: पराशर महाराज मंदिरात दिव्यांच्या साक्षीने रंगला दीपोत्सव!
पारध (प्रतिनिधी) : भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील ऐतिहासिक श्री पराशर महाराज मंदिरात यंदा दीपोत्सवानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. ७ रोजी करण्यात आले होते. हजारो पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात साजऱ्या झालेल्या या दीपोत्सवाने परिसरातील भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
मंदिर परिसरात आकर्षक पद्धतीने लावलेल्या दिव्यांमुळे परिसराला अतिशय नयनरम्य स्वरूप प्राप्त झाले होते. रंगीबेरंगी रोषणाई आणि पणत्यांच्या प्रकाशाने अवघा परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्यास गुरुवर्य श्री. अवधूतानंदगिरी महाराज तसेच श्री. देवेंद्र चैतन्य स्वामी यांची पावन उपस्थिती लाभली, ज्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वाद दिले.
दीपोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी दीपप्रज्वलनानंतर भजन, कीर्तन, आरती आणि महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दीपोत्सवाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम घडविणारा हा दीपोत्सव पारधच्या धार्मिक परंपरेत एक विशेष व आनंदाचा क्षण ठरला.



