जालन्यात हॉटेल बकासुरजवळून चोरीच्या बाईकसह एक जेरबंद; अल्पवयीन बालकाचाही सहभाग उघड!
By तेजराव दांडगे

जालन्यात हॉटेल बकासुरजवळून चोरीच्या बाईकसह एक जेरबंद; अल्पवयीन बालकाचाही सहभाग उघड!
जालना (प्रतिनिधी): जिल्ह्यात मोटार सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश उच्चाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून तब्बल १ लाख ४० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.
अशी झाली कारवाई:
५ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नवीन मोंढा परिसरातील हॉटेल बकासुर बायपास रोडवर एका तरुणाकडे चोरीची मोटारसायकल आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अजय एकनाथ टेकाळे (वय १८ वर्षे, रा. हिंदनगर, जालना) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या शाईन मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने ती चोरीची असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीची शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली. यासंदर्भात जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
चौकशीत उघड झाला मोठा गोलमाल:
अजय टेकाळे याला अधिक विचारपुस केली असता, त्याने ही मोटारसायकल एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आणखी ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल काढून दिली. ती देखील जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग भोकरदन नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, दिपक घुगे, सागर बाविस्कर, धिरज भोसले, सोपान क्षिरसागर सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.



