जालना: पारध पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर जप्त!
By तेजराव दांडगे

जालना: पारध पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर जप्त!
वनविभागाशी पत्रव्यवहार; दोन्ही कारवायांमध्ये वाहनांसह लाकडांचा साठा पोलिसांच्या ताब्यात
पारध बु. (विशेष बातमी): जालना जिल्ह्यात अवैध धंदे व विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पारध पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरात गस्त घालत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून विनापरवाना व अवैध लाकूड वाहतूक करणारे एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे.
पहिली कारवाई: पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर ट्रक जप्त
दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पारध पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, पिंपळगाव रेणुकाई ते भोकरदन रस्त्यावरील साई हॉटेलजवळ एका ट्रकमध्ये अवैध तोडलेल्या लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा चाकी ट्रक (क्र. MH-04 FJ-1677) थांबवून पाहणी केली असता, ट्रकमध्ये वडाच्या लाकडांचा साठा अर्धवट भरलेला मिळून आला. ट्रॅक्टर/ट्रक चालक मुक्त्तार खान शौकत खान पठाण (वय ४२, रा. अजिंठा, ता. सोयगाव/सिल्लोड) याच्याकडे लाकूड तोडणी व वाहतुकीबाबत विचारपूस केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
दुसरी कारवाई: अवघडराव सावंगी शिवारात ट्रॅक्टरवर कारवाई
तसेच दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी अवघडराव सावंगी शेतशिवारात अरबाज शेख यांच्या शेताजवळील रस्त्यावरून महिंद्रा ५७५ DI कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. MH-30 J-7169) व विना-नंबरची ट्रॉली लाकडाची वाहतूक करत असताना पोलिसांनी थांबवले.
चालक सय्यद सलिम सय्यद साबिर (वय ३५, रा. अवघडराव सावंगी) याच्याकडे चौकशी केली असता, ट्रॉलीतील लिंबाची लाकडे ही कलीम करीम शहा (वय ४६, रा. अवघडराव सावंगी) यांची असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मालकाकडेही लाकूड तोडणी आणि वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळून आला नाही.
वनविभागाकडे पुढील कार्यवाही सुपूर्द
पारध पोलिसांनी दोन्ही कारवायांधील ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली व लाकडांचा साठा जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात लावला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी वनविभागाशी (Forest Department) अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. नेमाने, पोलीस अंमलदार सुनील जाधव, संतोष जाधव, वैभव थिगळे व सुरेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.



