घर बंद करून जाताय? जरा सांभाळून; चोरीच्या घटना टाळण्यासाठी पारध पोलिसांचे विशेष आवाहन!
By तेजराव दांडगे

घर बंद करून जाताय? जरा सांभाळून; चोरीच्या घटना टाळण्यासाठी पारध पोलिसांचे विशेष आवाहन!
पारध / विशेष बातमी: दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक आपली घरे बंद करून बाहेरगावी किंवा नातेवाईकांकडे जात असतात. अशा वेळी बंद घरांचा गैरफायदा घेऊन घरफोडी, भुरट्या चोऱ्या तसेच वाहनचोरीच्या घटना घडण्याची दाट शक्यता असते. सणासुदीच्या या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पारध पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारध पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरामध्ये विशेष गस्त वाढवण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थिती व सणासुदीच्या दिवसांत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घ्यायची विशेष काळजी:
- मौल्यवान ऐवज सुरक्षित ठेवा: बाहेरगावी गावाला जाताना घरातील सोने-नाणे व मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
- सीसीटीव्ही यंत्रणा: आपली दुकाने, व्यापारी आस्थापना आणि घरांच्या आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी.
- वाहनांची सुरक्षा: स्वतःची वाहने रस्त्यावर किंवा घरासमोर उभी करताना योग्य प्रकारे लॉक केली असल्याची खात्री करावी.
- तात्काळ संपर्क साधा: परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास न घाबरता तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा पारध पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून वेळेवर मदत मिळू शकेल.
पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्वांच्या सहकार्यानेच सुरक्षित आणि आनंदी वातावरणात दीपावली साजरी करता येऊ शकते.



