जागतिक स्तनपान सप्ताह: ‘आईचे दूध बाळासाठी अमृततुल्य’
स्तनपानाचे महत्त्व: 'इन्व्हेस्ट इन ब्रेस्टफिडिंग, इन्व्हेस्ट इन द फ्युचर'

जागतिक स्तनपान सप्ताह: ‘आईचे दूध बाळासाठी अमृततुल्य’
जालना, दि. ४ : १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा होत असून, यावर्षीची थीम ‘Invest in Breastfeeding. Invest in the future’ (स्तनपानात गुंतवणूक करा, भविष्यात गुंतवणूक करा) अशी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्तनपानाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
बाळाचे पहिले लसीकरण
बाळाच्या जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे बाळाचे पहिले लसीकरण ठरते. आईच्या दुधामुळे बाळाला जीवाणू आणि विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण मिळते, तसेच बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास उत्तम होतो. यामुळे बाळाची निरोगी सुरुवात होऊन त्याचे भविष्य आशादायी होते.
आईच्या दुधाचे फायदे
आईच्या दुधामध्ये जवळपास ८० टक्के पाणी असते आणि ते बाळाच्या पोषणासाठी अत्यंत पोषक असते. सहा महिन्यांपर्यंत बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही देऊ नये. सहा महिन्यांनंतर पूरक आहारासोबत दोन वर्षांपर्यंत स्तनपान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बाळ कुपोषित किंवा आजारी पडत नाही. बाटलीबंद दूध वापरणे टाळावे.
आईसाठीही महत्त्वाचे
स्तनपानामुळे बाळाचे आरोग्य सुधारतेच, पण आईसाठीही त्याचे अनेक फायदे आहेत. स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो. स्तनपान हे आई आणि बाळाचे नाते अधिक घट्ट करते. सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजण्यासाठी अनेक शासकीय रुग्णालये आणि इतर ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध आहेत.
गर्भवती मातांसाठी आवाहन
गर्भवती मातांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. आईचे आरोग्य चांगले असेल तरच बाळाचे आरोग्य उत्तम राहते. आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी स्पष्ट केले आहे.