मोठी बातमी: अनुदान घोटाळा प्रकरणी कोतवाल व एजंट अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
By तेजराव दांडगे

मोठी बातमी: अनुदान घोटाळा प्रकरणी कोतवाल व एजंट अटकेत; आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जालना: अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या अनुदान वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यात तलाठ्यांना मदत करणाऱ्या एका कोतवाल आणि एका खाजगी एजंटला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
२५ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीत अटकेत
जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. ४५३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात सुमारे ₹२४,९०,७७,८११/- (जवळपास २५ कोटी रुपये) इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी या गुन्ह्यात सहाय्य्क महसूल अधिकारी सुशिलकुमार दिनकर जाधव यांना अटक करण्यात आली होती आणि ते सध्या जिल्हा कारागृहात आहेत. तसेच, अंबड येथील तलाठी शिवाजी श्रीधर ढालके याला १९/०९/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
कोतवाल आणि एजंटचा सक्रिय सहभाग
तलाठी शिवाजी ढालके याच्या चौकशीत, त्याने त्याचे मूळ गाव उमरी बाजार (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील ५० हून अधिक लोकांची नावे त्याच्या सजेतील दाढेगाव (ता. अंबड) येथे टाकून आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
या गैरव्यवहारात आरोपीतांना मदत करणाऱ्या कोतवाल आणि एजंटचा सक्रिय सहभाग दिसून आल्याने, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने खालील दोन आरोपीतांना काल रात्री अटक केली आणि त्यांना आज न्यायालयात हजर केले:
१. मनोज शेषराव उघडे (कोतवाल, रा. दाढेगाव, ता. अंबड)
२. साहेबराव उत्तमराव तुपे (खाजगी सहाय्यक, रा. पिठोरी सिरसगाव, ता. अंबड)
न्यायालयाने दोन्ही आरोपीतांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड (PCR) मंजूर केली आहे.
टक्केवारीवर चालत होता बोगस नावांचा खेळ
तलाठ्यांचे काम सोपे करण्यासाठी आणि अनुदान यादीत जास्तीत जास्त बोगस नावे टाकण्यासाठी तलाठ्यांनी काही एजंट/खाजगी सहाय्यकांचा वापर केला. या बदल्यात एजंट/सहाय्यकांना टक्केवारीनुसार आर्थिक लाभ मिळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात आरोपीतांना सहाय्य करणाऱ्या इतर एजंटचा शोध घेत आहे. उर्वरित आरोपीतांना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
अजयकुमार बंन्सल (पोलीस अधीक्षक, जालना), आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक, जालना), व श्री सिध्दार्थ माने (प्रभारी पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना) यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे (स.पोलीस निरीक्षक) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.