लांडग्यांचा कहर; ३६ शेळ्यांची पिल्ले ठार, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
By देवानंद बोर्डे

लांडग्यांचा कहर; ३६ शेळ्यांची पिल्ले ठार, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
पिंपळगाव रेणुकाई, दि. 01: भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांगवी येथे एका हृदयद्रावक घटनेत लांडग्यांच्या हल्ल्यात तब्बल ३६ शेळ्यांची पिल्ले ठार झाली आहेत. यामुळे शेतकरी गजानन विठ्ठल किटे यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना, दि. 29 एप्रिल रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गजानन किटे दुपारी दोनच्या सुमारास आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यांच्या गट क्रमांक ११३ मधील शेतात, जिथे शेळ्या बांधलेल्या होत्या, तिथे कुंपणाच्या खालची माती उकरून लांडग्यांनी प्रवेश केला. त्यानंतर या लांडग्यांनी थेट शेळ्यांच्या असहाय्य पिल्लांवर हल्ला चढवला आणि ३६ निष्पाप जीवांचा बळी घेतला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक झालेल्या या लांडग्यांच्या हल्ल्यामुळे इतर पशुपालकही धास्तावले असून, त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी गजानन किटे यांनी वनविभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे किटे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
“वनविभागाने व अधिकाऱ्यांनी घटनेचा तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी.” – गजानन किटे, शेतकरी
या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि वन विभागाने तातडीने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.