भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
By तेजराव दांडगे

भोकरदन तालुक्यातील पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पारध, दि. 14: भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील विविध महत्वाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मनीष श्रीवास्तव, ग्रामसेवक संजय पुरी, सरपंचपती बाबुराव काकफळे, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचारांना नमन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषद माजी सभापती मनीष श्रीवास्तव, पंचायत समिती माजी सभापती परमेश्वर लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. संग्राम देशमुख, जनता विद्यालयाचे सचिव उदयसिंह लोखंडे, प्रा. महेंद्र लोखंडे तसेच पत्रकार बांधवासहित अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाला उजाळा दिला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचे महत्व सांगितले आणि त्यांच्या विचारांना आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देण्यात आली. त्यांच्यामुळेच आज समाजात समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकला आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.