जालना: गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून 4 किलो 579 ग्रॅम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By तेजराव दांडगे

जालना: गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून 4 किलो 579 ग्रॅम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना, दि. 18: जिल्ह्यातील चंदनझिरा येथे मानवी आरोग्यास घातक असलेल्या गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी महिलेच्या घरातून 4 किलो 579 ग्रॅम गांजा जप्त केला आहे, ज्याची किंमत 91,580 रुपये आहे.
पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अवैध गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढण्यास सुरुवात केली.
16 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून चंदनझिरा येथील लहुजीनगर झोपडपट्टी, एकतानगर येथे राहणाऱ्या पूजा ओमप्रकाश नाईक (वय 30) यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात महिलेच्या ताब्यातून 4 किलो 579 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात पूजा नाईक यांच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.