पंधरा कोटींच्या भव्य स्मारकासाठी जागेची पाहणी: आमदार संतोष दानवे आणि सीईओ मिनू पी.एम. यांचा पारध परिसरात ‘ग्रँड’ दौरा
छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी; आमदार संतोष दानवे आणि सीईओ मिनू पी.एम. यांचा पारध परिसरात 'ग्रँड' दौरा

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी; आमदार संतोष दानवे आणि सीईओ मिनू पी.एम. यांचा पारध परिसरात ‘ग्रँड’ दौरा
पंधरा कोटींच्या भव्य स्मारकासाठी जागेची पाहणी: आमदार दानवे आणि सीईओ मिनू पी.एम. यांचा पारध परिसरात ‘ग्रँड’ दौरा
पारध, दि. ०५ (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील ऐतिहासिक पारध बुद्रुक येथे लवकरच एक भव्य इतिहास उभा राहणार आहे. येथे प्रस्तावित असलेल्या ‘थोरले’ छत्रपती शाहू महाराज यांच्या पंधरा कोटींच्या स्मारकासाठी जागेचा शोध घेण्यासाठी आमदार संतोष दानवे आणि जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. (आयएएस) यांनी मंगळवारी विविध ठिकाणांची पाहणी केली.
हा केवळ एक स्मारक नसून, या पंधरा कोटींच्या प्रकल्पात शिव छत्रपती दालन, रायगड जिल्ह्याची थ्री डी प्रतिकृती आणि एक प्रभावी ऑडिओ व्हिज्युअल शो देखील साकारण्यात येणार आहे. यासाठी किमान अडीच ते कमाल पाच एकर जागेची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या भव्य प्रकल्पासाठी योग्य जागेचा कानोसा घेण्यासाठी शिष्टमंडळाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. यामध्ये महर्षी पराशर ऋषी संस्थानच्या मंदिर परिसरातील उर्वरित जमीन, गावातील छत्रपती शाहू महाराजांचा पुरातन वाडा व बुरुज, श्री बालाजी संस्थानची अवघडराव सावंगी रस्त्यावरील ३२ एकर इनामाची जमीन, तसेच पारध-वालसावंगी रस्त्यावरील पद्मावती धरण आणि निजामकालीन नाका परिसर यांचा समावेश होता.
या महत्त्वपूर्ण दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात माजी पं. स. सभापती परमेश्वर लोखंडे, माजी जि. प. सभापती मनीष श्रीवास्तव, माजी सरपंच गणेश लोखंडे व अशोक लोखंडे, भाजयुमोचे देवेंद्र लोखंडे, शिवा लोखंडे, पवन लोखंडे, परमेश्वर अल्हाट, शेख नदीम, निवेदक महेंद्र लोखंडे, बंटी बेराड, गणेश तेलंग्रे, सुनील बेराड, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष रवी लोखंडे, समाधान तेलंग्रे, सागर देशमुख, विकास लोखंडे यांचा सहभाग होता.
यासोबतच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता शेलगार मॅडम, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे, उप कार्यकारी अभियंता शेजुळ, विस्तार अधिकारी सोनुने, गजानन पाखरे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद आणि धरणाची पाहणी
या पाहणी दौऱ्यादरम्यान, आमदार दानवे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. यांनी पारध परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. त्यांनी मिरची खरेदी-विक्री व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच, पद्मावती धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थितीही जाणून घेतली.
‘एकत्र येऊन काम करा’: आमदार दानवे
या प्रसंगी बोलताना आमदार संतोष दानवे म्हणाले, “मी खूप प्रयत्नांनी पारध येथे छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावून घेतला आहे. आता प्रत्येक गावकरी, प्रत्येक समाजबांधव, जात-पात, धर्म-पक्ष विसरून हे काम लवकरात लवकर आणि आखीव-रेखीव कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हे काम आपण सर्वांनी मिळून साकारायचे आहे.”
‘जागा निश्चित होताच कामाला सुरुवात’: सीईओ मिनू पी. एम.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. म्हणाल्या, “स्मारकासाठी लागणारी जागा निश्चित होताच लगेच या कामाला सुरुवात केली जाईल. या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यात कसलीही हलगर्जी करणार नाहीत यासाठी त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.”