दोन महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार ‘लक्ष्मण गोरे’ अखेर जेरबंद; गावठी कट्टा विक्री करणाऱ्या साथीदारालाही स्थानिक गुन्हे शाखेने पकडले.
By तेजराव दांडगे

दोन महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार ‘लक्ष्मण गोरे’ अखेर जेरबंद; गावठी कट्टा विक्री करणाऱ्या साथीदारालाही स्थानिक गुन्हे शाखेने पकडले.
जालना (प्रतिनिधी): जालना शहरात दहशत निर्माण करून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या लक्ष्मण किसन गोरे (रा. गोकुळवाडी, जालना) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B.) जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. गोरे याच्या चौकशीतून त्याने विक्री केलेला एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.
गुन्हेगार गोरेचा दोन महिन्यांपासून धुमाकूळ:
मागील काही महिन्यांपासून लक्ष्मण गोरे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करत होता. त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत:
१) जिवे मारण्याची धमकी: दि. ३०/०९/२०२५ रोजी अशोक भोसले (रा. गोकुळवाडी) यांच्या घराचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
२) मारहाण व धमकी: दि. १९/०८/२०२५ रोजी वाघुळ घाट, जालना येथे कृष्णा भोपळे (रा. सोनगिरी) यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
३) सायबर गुन्हा: दि. ०५/०८/२०२५ रोजी कल्याणी तौर यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून मयत गजानन तौर यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पोस्ट पाठवल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तांत्रिक तपासात या गुन्ह्यातही लक्ष्मण गोरे हा निष्पन्न आरोपीत होता.
जळगाव येथून अटक, शस्त्रसाठा जप्त:
वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीत लक्ष्मण गोरे हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गोरे याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गोरे जळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. दिनांक २५/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथे जाऊन गोरेला ताब्यात घेतले.
विक्री केलेला गावठी कट्टाही जप्त:
गोरे याच्याकडे त्याने वापरलेल्या गावठी कट्ट्याबद्दल विचारणा केली असता, त्याने तो कट्टा आतिष प्रकाश पाटोळे (रा. पिवळा बंगला, जालना) यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आतिष पाटोळे याला दि. २५/१०/२०२५ रोजी पाठक मंगल कार्यालय, जालना येथून ताब्यात घेतले.
पाटोळे याच्या ताब्यातून रु. ३०,२००/- किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पाटोळे याने हे गावठी पिस्टल मागील एका महिन्यापासून त्याचा मित्र कुलदीप उर्फ जज्या जगधने याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले, मात्र कुलदीप फरार आहे.
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे पो.उपनि. राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक:
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ व स्थागुशाचे अंमलदार रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, रमेश काळे यांनी पार पाडली.



