गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना: ‘अन्न सुरक्षा’ नियमांचे पालन करण्याचे आवाहन
By तेजराव दांडगे

गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना: ‘अन्न सुरक्षा’ नियमांचे पालन करण्याचे आवाहन
जालना, दि. २६ ऑगस्ट: जालना जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सर्व गणेशोत्सव मंडळांना ‘अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६’ चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मंडळांनी भंडाऱ्यासाठी किंवा अन्नदानासाठी तयार केला जाणारा प्रसाद सुरक्षित आणि आरोग्यदायी असावा, यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मंडळांसाठी महत्त्वाचे नियम: १) नोंदणी आणि परवाना: प्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑनलाइन अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे.
२) स्वच्छता: प्रसाद तयार करण्याची जागा पूर्णपणे स्वच्छ आणि आरोग्यदायी असावी.
३) साहित्य खरेदी: प्रसादासाठी लागणारा किराणा माल परवानाधारक किंवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा.
४) पाण्याचा वापर: प्रसाद तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करावा.
५) भांडी आणि उपकरणे: प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ, झाकण असलेली आणि आरोग्यदायी असावीत.
६) अन्न पदार्थांची विल्हेवाट: शक्य तेवढाच प्रसाद तयार करावा आणि उरलेल्या शिळ्या अन्नाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
७) स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी: प्रसाद तयार करणारे आणि वाटप करणारे स्वयंसेवक कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावेत.
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जालना यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. यामुळे गणेशोत्सव सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात साजरा होण्यास मदत होईल.