‘संघटित शक्ती’च्या बळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्धार; पारध येथे ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक संपन्न
By तेजराव दांडगे

‘संघटित शक्ती’च्या बळावर निवडणुकीत उतरण्याचा निर्धार; पारध येथे ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक संपन्न
पारध (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि समाजातील सद्य:स्थितीवर विचारमंथन करण्यासाठी रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पारध बू (ता. भोकरदन) येथे ओबीसी समाजाची एक महत्त्वपूर्ण चिंतन व आढावा बैठक उत्साहात पार पडली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत समाजाला निर्णायक स्थान मिळवून देण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ नेते दिलीप बेराड यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी ओबीसी समाजाचे नेते ॲड. एफ. एच. सिरसाठ आणि बहुजनवादी विचारवंत मु. एम. बी. मगरे (छत्रपती संभाजीनगर) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
ॲड. सिरसाठ यांनी “ओबीसी समाजाची दशा व दिशा आणि उपाय योजना” या महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर एम. बी. मगरे यांनी आपल्या भाषणात, ‘राजकीय पक्षांनी आजवर ओबीसी समाजाचा केवळ वापर केला असून, आता समाजाने जागृत होऊन स्वतःचा सक्षम राजकीय पर्याय उभा करणे आणि आपल्या संघटित शक्तीचे प्रदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे,’ असा स्पष्ट संदेश दिला.
या बैठकीला पारध येथील विविध समाज घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात किरणशेठ श्रीवास्तव, डॉ. उमेशचंद्र वडगावकर, ज्ञानेश्वर मोरे, रामधन साबळे, जनार्दन पाखरे, संदीप क्षीरसागर, नरेंद्र कानडे, महेंद्र बेराड, संदीप काटोले, ज्ञानेश्वर आल्हाट, अमोल पाखरे, गणेश तेलंग्रे, गणेश बडनेरे, दिनेश तेलंग्रे, शेख सादिक मनियार आदी मान्यवरांचा सहभाग होता.
सदर बैठक यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे, किरण शेठ श्रीवास्तव, अमोल पाखरे आणि नरेंद्र कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचा परिचय महेंद्र बेराड यांनी करून दिला, तर संदीप काटोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीच्या माध्यमातून ओबीसी समाजाने येणाऱ्या निवडणुकीत अत्यंत संघटितपणे आणि निर्णायक भूमिका बजावण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.



