जालन्यात ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सचा दिमाखदार सोहळा!
जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांचा 'लोकमत'ने केला सन्मान; विविध क्षेत्रांतील 13 कर्तृत्ववान सरपंचांना गौरव

जालन्यात ‘लोकमत’ सरपंच अवॉर्ड्सचा दिमाखदार सोहळा!
जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांचा ‘लोकमत’ने केला सन्मान; विविध क्षेत्रांतील 13 कर्तृत्ववान सरपंचांना गौरव
जालना, दि. 17 (प्रतिनिधी) : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने गुरुवारी (दि. 15) अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स येथे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जिल्ह्याभरातील 13 विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शानदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, बीकेटी टायर्सच्या प्रतिनिधी प्राजक्ता अग्रवाल, मलबार गोल्ड अँड डायमंडचे सीनिअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शेख इम्रान, एमपी बिर्ला सिमेंटचे रिजनल सेल्स हेड अतुलकुमार सिंग, शाखा व्यवस्थापक नावेद मुनसी, आणि बीकेटीचे तिलक पारिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
बीकेटी टायर्स प्रस्तुत आणि संतूर, मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड तसेच एमपी बिर्ला सिमेंट यांच्या सहकार्याने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात पारंपरिक गणेशवंदनेने झाली. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी, पुरस्कारांसाठी सरपंचांची निवड करणाऱ्या ज्युरी मंडळाच्या सदस्यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सहयोगी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हाभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील 13 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्तृत्ववान सरपंचांना गौरविण्यात आले. या सन्मानामुळे सरपंचांनी आनंद व्यक्त केला आणि पुढील कामासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’चे मानकरी:
• जलव्यवस्थापन: सूर्यकांत बरकुले (खांडवी, ता. परतूर)
• वीज व्यवस्थापन: विजया भुतेकर (हिवर्डी ता. जालना)
• शैक्षणिक सुविधा: रेखा जंजाळ (भायडी, ता. भोकरदन.)
• स्वच्छता: भगवानराव राखुंडे (सुखापुरी, ता. अंबड)
• आरोग्य: डॉ. स्वाती काकडे (जयपूर, ता. मंठा)
• पायाभूत सुविधा: सदाशिव वाघ (मानेपुरी, ता. घनसावंगी)
• ग्रामरक्षा: सूरज सहाने (सिरसगाव मंडप, ता. भोकरदन)
• पर्यावरण संवर्धन: मीरा खाडे (पिंपळवाडी, ता. जालना)
• प्रशासन, ई-प्रशासन: नीलिमाताई टोपे (पाथरवाला बुद्रुक, ता. अंबड)
• रोजगार निर्मिती / सरकारी योजना: शारदाबाई काकफळे (पारध, बु. ता. भोकरदन)
• कृषी व तंत्रज्ञान: मेराजोद्दीन रियाजोद्दीन खतीब (आंबा, ता. परतूर)
• उदयोन्मुख नेतृत्व: आश्विनी डेंगळे (मानेगाव ज. ता. जालना)
• सरपंच ऑफ द इअर: स्वप्ना वांजुळे (चितळी पुतळी, ता. जालना)
• संतूर अवॉर्ड: मुक्ता बरंडे (सोयगाव, ता. बदनापूर)
याप्रसंगी बोलताना बीकेटी टायर्सच्या मराठवाडा वितरक प्राजक्ता अग्रवाल म्हणाल्या, “‘लोकमत’च्या माध्यमातून बीकेटी टायर्सच्या वतीने गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील सरपंचांचा गौरव करणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही नेहमीच दर्जेदार बीकेटी टायर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवतो आणि या कामासोबतच गावपातळीवर चांगले काम करणाऱ्या सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करत असतो.”
संतूर अवॉर्डच्या मानकरी ठरलेल्या सोयगावच्या सरपंच मुक्ता बरंडे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, “‘लोकमत’ नेहमीच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करते. ‘लोकमत सरपंच ऑफ द इअर’ हा पुरस्कार ग्रामीण भागातील विकासकामे करणाऱ्या सरपंचांना आणि सदस्यांना निश्चितच प्रोत्साहन देणारा आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना मिळाला नाही त्यांनी पुढील वर्षी अधिक चांगले काम करून विजेता बनण्याचा प्रयत्न करावा.”
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “‘लोकमत’च्या सरपंच अवॉर्ड पुरस्कारातील निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पडल्यामुळे योग्य सरपंचांची निवड झाली आहे. गावात विकासकामे करण्याची सरपंचांना मोठी संधी आहे. ज्या सरपंचांना आज पुरस्कार मिळाला आहे, त्यांनी आपले गाव राज्याच्या आदर्श गावांमध्ये स्थान कसे मिळवेल यासाठी प्रयत्नशील राहावे.”
एमपी बिर्ला समूहाचे रिजनल सेल्स हेड अतुलकुमार सिंग यांनी सांगितले की, सरपंच अवॉर्डमधील निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि काटेकोर होती, त्यामुळे योग्य निवड झाली आहे. भविष्यातही एमपी बिर्ला समूहातर्फे असे प्रेरणादायी उपक्रम गावपातळीवर राबविले जातील.