देश विदेश
मोठी बातमी! भारताचा कोहिनूर हरपला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
नवी दिल्ली : जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ९२ वर्षांचे होते. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.
विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. ३३ वर्षे ते राज्यसभेचे सदस्य होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर १० वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.
डॉ. मनमोहन सिंग १९७१ पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते १९९८-२००४ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी २२ मे २००४ आणि पुन्हा २२ मे २००९ रोजी पंतप्रधानपद स्वीकारले होते. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.
यामध्ये १९७८ मध्ये पद्मविभूषण, १९९३ मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, १९९३ आणि १९९४ या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि १९९५ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी १९५२ मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि १९५४ मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले होते.
तर १९७१ मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच १९७२ मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली होती.