शेतकऱ्यांनी घेतला मोकळा श्वास; मुगाला ५५०० रूपयांपर्यंतचा भाव…
सभापती उदय वाघ यांचे शेतकर्यांनी मानले जाहीर आभार अमळनेर – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून पूर्वपदावर आले. शेतकरी हित डोळ्यापुढे ठेवत शेतकरीपुत्र सभापती उदय भिकनराव वाघ यांनी शिष्टाई करत व्यापार्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. पहिल्याच दिवशी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणला. मूगाला 3500 ते 5500 रूपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त करत सभापती उदय वाघ यांचे जाहीर आभार मानले.
हमीभावारून गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांचा मालाची खरेदी ठप्प झाली होती. बाजार समितीमध्ये एफ.ए.क्यू. माल (चांगला दर्जाचा) हा हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा. जो माल नॉन एफ.ए.क्यू. (कमी प्रतीचा) आहे त्याची खरेदी कमी भावाने केली तरी चालेल. मात्र तो माल कमी प्रतिचा असल्याचे समितीने पत्र दिले पाहिजे, असा निर्णय बैठकीत झाला. नॉन एफएक्यू दर्जाच्या मालाची प्रतवारी ठरविण्यासाठी सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी आणि बाजार समितीचे सचिव अशांची त्रिसदस्यीय समितीही यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
सभापतींच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी सहकार्य दर्शविले. बाजार समितीचे कामकाज सोमवारपासून पूर्वपदावर येणार असल्याचा निरोप सभापती वाघ यांनी गावागावात पोहचवला होता. पोळ्याच्या पूर्वसंधेला ही बातमी येवून धडकल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्यांनी सुटकेचा श्वास घेतला व सोमवारी मोठी गर्दी उत्पादक शेतकर्यांनी केली. शेतकरी हित हाच आपला केंद्रबिंदू असून यापुढेही शेतकरी हिताचेच निर्णय घेतले जातील अशी प्रतिक्रीया सभापती उदय वाघ यांनी बोलताना दिली.