उसतोड कामगाराची ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांकडून ₹6.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

उसतोड कामगाराची ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांकडून ₹6.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
सविस्तर बातमी:
जालना, दि ३१: जिल्ह्यातील मौजपुरी पोलिसांनी उसतोड कामगाराची ट्रॅक्टरची ट्रॉली आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ₹6 लाख 65 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना 28 जुलै 2025 रोजी घडली. फिर्यादीने नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीचे महिंद्रा अर्जुन 555 ट्रॅक्टर आणि लाल रंगाची ऊसतोडीसाठी वापरली जाणारी ट्रॉली मौजे हातवण शिवारातील शेतात उभी केली होती. रात्रीच्या वेळी, अज्ञात चोरट्यांनी तिथे झोपलेल्या तीन मुलांचे मोबाईल आणि ट्रॅक्टरची ट्रॉली चोरून नेली. याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांनी शिवाजी पुंजाराम खोमणे (रा. भाटेपुरी) या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपला साथीदार परमेश्वर उर्फ लहानु रघुनाथ चंद (रा. मांडवा, जालना) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरलेला मुद्देमाल बीड जिल्ह्यातील वडवणी येथे ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी वडवणी येथे जाऊन दोन्ही आरोपीतांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरची ट्रॉली आणि मोबाईल असा एकूण ₹6 लाख 65 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सध्या दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीतांकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात पोउपनि विजय तडवी, ग्रे. पोउपनि प्रकाश जाधव, सफौ ज्ञानोबा बिरादार, पोह राजेंद्र देशमुख, मपोह रंजना चव्हाण, भगवान खरात, पोअं प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, धोंडीराम वाघमारे, सदाशिव खैरे, आणि कैलास शिवणकर यांचा समावेश आहे.