बदनापूर येथे जबर चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

बदनापूर येथे जबर चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना, ११ जुलै २०२५: बदनापूर येथे एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि आयफोन बळजबरीने हिसकावून घेणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे ९५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
३० जून २०२५ रोजी उद्धव निवृत्ती बनकर (वय ३८, रा. सातेफळ, ता. जाफ्राबाद, ह.मु. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, एका अनोळखी महिलेने त्यांच्याकडून QR कोडद्वारे ५,००० रुपये मागितले. त्यानंतर तिने तिच्या दोन साथीदारांसह पूर्वनियोजित कट रचून फिर्यादीच्या स्कॉर्पिओ गाडीत बळजबरीने प्रवेश केला. फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या खिशातील १०,००० रुपये रोख रक्कम आणि ॲपल कंपनीचा आयफोन बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुरनं. २३५/२०२५ कलम ३०९ (४) भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
या गुन्ह्याचा तपास करत असताना, ११ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. त्यात, हा गुन्हा सपना संतोष निकाळजे (वय २२, रा. पांग्री उगले, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) हिने तिच्या दोन पुरुष साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सपना निकाळजेला ताब्यात घेतले असता, तिने गुन्हा केल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल
सपना निकाळजेकडून पोलिसांनी १५,००० रुपये रोख (ज्यात QR कोडवर मागितलेले ५,००० रुपये आणि खिशातून हिसकावलेले १०,००० रुपये समाविष्ट आहेत), तसेच ८०,००० रुपये किमतीचा आयफोन १५ मोबाईल आणि एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ९५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास
अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीतास पुढील तपासकामी बदनापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यशस्वी कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग जालना, अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच स्थागुशाचे अंमलदार गोपाल गोशिक, लक्ष्मीकांत आडेप, फुलचंद गव्हाणे, देविदास भोजणे, सागर बाविस्कर, सतिश श्रीवास, आक्रुर धांडगे, कैलास चेके, भागवत खरात, चालक अशोक जाधवर आणि महिला पोलीस अंमलदार चंद्रकला शडमल्लु, कल्पना बांडे, कविता काकस, अरुणा गायकवाड, सत्यभामा उबाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.