दोन तासात खुनाचा आरोपीत जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By तेजराव दांडगे

दोन तासात खुनाचा आरोपीत जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना, दि. 26: देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या पाठीमागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात दिनांक २५/०४/२०२५ रोजी रात्री नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे (रा. कन्हैया नगर, जालना) नावाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने हत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, जालना यांनी तात्काळ मारेकऱ्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिले. पंकज जाधव यांनी तातडीने पथक तयार करून आरोपीताच्या शोधासाठी रवाना केले.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेश रंजवे याचा मित्र संदीप ज्ञानेश्वर राऊत (रा. कन्हैया नगर, जालना) यानेच खून केला असून तो जामवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ संदीप राऊतचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीत संदीप राऊतने खुनाची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो भागीरथी टी हाऊसवर असताना मयत नरेश रंजवे याने त्याला दारू पिण्यास भाग पाडले. आरोपीताने नकार दिल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मयताने आरोपीताच्या आईला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून आरोपीताने लोखंडी कुऱ्हाडीने नरेशच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आरोपीताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षिरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, चापोहेकौं गणपत पवार, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे या सर्वांनी केली आहे.