सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; दोघांना अटक, इतरांचा शोध सुरु!
By तेजराव दांडगे

सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; दोघांना अटक, इतरांचा शोध सुरु!
जालना, 7 जुलै 2025: पैशांच्या व्यवहारातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या इतर आरोपीतांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै 2025 रोजी नवीन मोंढा भागातील रहिवासी सुभाषचंद्रजी बंकटलालजी पटवारी (रा. मोदीखाना, जालना) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या धक्कादायक घटनेनंतर त्यांचा मुलगा राजेश पटवारी यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुभाषचंद्रजी यांना जालन्यातील पाच लोकांनी हातउसने आणि व्याजाच्या पैशांसाठी खूप त्रास दिला होता, ज्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं राजेश पटवारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी नरेश उर्फ लाला रामेश्वर हटेला (रा. नाथबाबा गल्ली, जालना) आणि चेतन नंदलाल भुरेवाल (रा. मिशन हॉस्पिटल जवळ, जालना) या दोघांना काल रात्री उशिरा अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपीतांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आणखी काही आरोपीतांचा सहभाग असण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सपोनि सुशील चव्हाण, पोहेकॉ कृष्णा तंगे, अशोक जाधव, पोना अभिजीत वायकोस, पोकॉ नवनाथ पाटील, दिपचंद डेहंगळ यांनी केली आहे.