पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांचे सरस्वती विद्यालयात मार्गदर्शन; विद्यार्थीनींना सुरक्षा मंत्राचे धडे
By तेजराव दांडगे

पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांचे सरस्वती विद्यालयात मार्गदर्शन; विद्यार्थीनींना सुरक्षा मंत्राचे धडे
पारध, दि. 15: पोलीस स्टेशन पारध येथील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांनी आज दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी शेलूद येथील सरस्वती विद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी शाळेतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
सिनकर यांनी विद्यार्थ्यांना विशेषतः लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो), बाल मानसशास्त्र, सायबर क्राईम आणि चांगला स्पर्श-वाईट स्पर्श यांसारख्या संवेदनशील विषयांवर माहिती दिली. तसेच, समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि त्यासंबंधीचा जादू टोणा प्रतिबंधक कायद्याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींविषयी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले.
या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू विशेषतः शालेय विद्यार्थिनी होत्या. सिनकर यांनी विद्यार्थिनींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कोणतीतरी व्यक्ती त्यांचा कसा गैरफायदा घेऊ शकते आणि त्याचे गंभीर परिणाम त्यांना कसे भोगावे लागू शकतात, याबद्दल त्यांनी जागरूकता निर्माण केली. त्यामुळे विद्यार्थिनींनी सक्षम आणि निर्भय राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि तक्रार पेटी ठेवण्याची सूचना देखील प्रकाश सिनकर यांनी शाळा प्रशासनाला दिली.
याव्यतिरिक्त, पोलीस अधीक्षक, जालना यांनी प्रकाशित केलेल्या ‘मुलींचे संरक्षणाबाबत आधुनिक जगात एक पाऊल पुढे’ या सुरक्षा मंत्र पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे सिनकर यांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना हे सुरक्षा मंत्राचे उपयुक्त पुस्तक मोफत वाटण्यात आले.
जालना पोलिसांच्या व्हाट्सअप चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच, सुरक्षा मंत्र पुस्तिकेची डिजिटल आवृत्ती मिळवण्यासाठी पुस्तकात दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याची सूचना त्यांनी दिली. पुस्तकात नमूद केलेल्या पॉक्सो कायदा, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, सायबर गुन्हे, छळ, वाहतूक नियम आणि परीक्षा ताण व्यवस्थापन यांसारख्या विषयांवरील अधिक माहितीसाठी असलेले क्यूआर कोड देखील स्कॅन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांच्या या जनजागृतीपर कार्यक्रमामुळे सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.