अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध भरवस गावकऱ्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल..
अमळनेर (प्रतिनिधी)- मुसळी फाटा ते बेटावद राज्य मार्गावरील भरवस जवळील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल बेकायदेशीर रित्या राज्य मार्गावरून प्रमुख जिल्हा मार्गावर नेण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नाविरुद्ध गावकऱ्यानी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यमार्गावरच उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली आहे. राज्य मार्ग ६ मुळे अमळनेर, पारोळा,धरणगाव तालुक्यातून शिंदखेडा, नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर,शहादा तसेच गुजरात, मध्यप्रदेश जाण्यासाठी बेटावद पर्यंतचा मार्ग उपयोगी पडतो म्हणून शासनाने हायब्रीड अन्यूईटी अंतर्गत हा मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मार्गावर भरवस गावाच्या पुढे रेल्वे मार्ग असल्याने मोठी वाहने,बसगाड्या जाण्यास अडचणी येतात रेल्वे मार्गखालून लहानशा बोगद्यातून जाताना वाहनांना अडचणी येतात पावसाळ्यात लहान वाहने पाणी साचल्यामुळे बंद पडतात म्हणून या मार्गावर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला असून त्याचे इ-टेंडर निघाले असल्याचा दावा भरवस परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
मात्र हा पूल या राज्य मार्गावर न बांधता काही राजकीय लोक गळवाड़े, जैतपिर, चौबरी या प्रमुख जिल्हा मार्गावर बांधण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार ही अनेक गावकऱ्यांनी केली आहे. राज्य मार्गावरील उड्डाण पूल बेकायदेशीर पणे प्रमुख जिल्हा मार्गावर नेल्यामुळे झाडी,भरवस,लोण बु,लोण पंचम,लोण सिम,लोण खुर्द या गावांच्या अडचणीत वाढ होणार असून प्रवासातील भाडे वाढ देखील होणार आहे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीत ही वाढ होणार आहे म्हणून यापूर्वी अनेकदा गावकऱ्यांनी निवेदने देऊन तक्रारी केल्या होत्या मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे जनतेला न्याय मिळत नसल्याचा आरोप करीत संजय पाटील भरवस, किशोर पाटील भरवस, देविदास पाटील झाडी, मांगो ओंकार राठोड लोण, शिवाजी पाटील एकलहरे, बबन पाटील लोण यांनी ऍड प्रकाश पाटील यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून राज्य मार्गावरच उड्डाण पूल होण्याची मागणी केली आहे.
————————
संजय पाटील,याचिकाकर्ते भरवस
अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने ऑनलाईन टेंडर मागवले आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता उत्तर देण्यात आले नाही पुन्हा माहिती अधिकारात मागणी केली आहे.
———————–
पी.व्ही.मोरांणकर,कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर
भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील फक्त चोपडा रस्त्याच्या उड्डाण पुलाशिवाय कोणताही उड्डाण पूल मंजूर झालेला नाही त्यामुळे कामाचा प्रश्नच उदभवत नाही. व टेंडरही निघाले नाही.