जिल्हा परिषद शाळेने विठ्ठुमाऊलीची काढली दिमाखात दिंडी
By गोकुळ सपकाळ

जिल्हा परिषद शाळेने विठ्ठुमाऊलीची काढली दिमाखात दिंडी
जळगाव सपकाळ (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाची दिंडी गावात मोठ्या भक्तिभावाने आणि दिमाखात काढली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख धारण केला होता.
काही मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर काही विद्यार्थ्यांनी गळ्यात टाळ घेऊन मोठ्या भक्तिभावाने दिंडीत सहभाग घेतला. गावात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळल्या आणि अभंग, भारुड तसेच गौळणी गायल्या. शिक्षकांसह गावकऱ्यांनीही फुगड्या खेळून दिंडीची रंगत वाढवली.
गावातील महिलांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीतील विठ्ठुमाऊलींचे पूजन करत दिंडीचे स्वागत केले. या दिंडीतून ‘एक पेड मा के नाम’ (आईच्या नावाने एक झाड), स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणविषयक संदेशही देण्यात आले.
या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिताताई सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ सपकाळ, उपाध्यक्ष रामेश्वर दौड आणि सर्व सदस्यांनी केले. तसेच, गावाचे सरपंच कु. विशाखाताई साळवे, उपसरपंच श्रीमती रुखमनताई सपकाळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व पालक व ग्रामस्थांनीही दिंडीचे कौतुक केले.
या दिंडीसाठी शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख, शिक्षक अशोक आराक, सुभाष साबळे, नितीन बाहेकर, विजय पंडित, अनिल सपकाळ, रुपेश टाकळकर, भीमराव गायकवाड, भिकन लोखंडे, देवेंद्र बकाल, श्रीमती सुरेखा मिसाळ मॅडम, श्रीमती मानसी देशमुख मॅडम, श्रीमती अश्विनी वाघ मॅडम, श्रीमती अनिता लोखंडे मॅडम, श्रीमती भेंडाळे मॅडम आदींचे मार्गदर्शन लाभले.