चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘आनंद नगरी’चा जल्लोष; ‘आनंद नगरी’त विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावसायिकतेचे धडे!
By तेजराव दांडगे

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘आनंद नगरी’चा जल्लोष; ‘आनंद नगरी’त विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावसायिकतेचे धडे!
पारध, दि. १० (जालना): पुस्तकी ज्ञानाला जेव्हा व्यवहाराची जोड मिळते, तेव्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढतो. असाच एक कौतुकास्पद उपक्रम भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पार पडला. ‘आनंद नगरी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी चक्क व्यवसायाचा गल्ला सांभाळत आपली चुणूक दाखवली.
चिमुकल्या हातांनी सांभाळला गल्ला
आज या शाळेचे प्रांगण एखाद्या मोठ्या बाजारपेठेसारखे गजबजलेले होते. विद्यार्थ्यांनी केवळ पेन आणि वही न धरता चक्क व्यवसायाचे नियोजन केले. कोणी खमंग भेळ बनवण्यात मग्न होते, तर कोणी घरून आणलेल्या रुचकर पदार्थांची विक्री करत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पैसा, बाजार आणि वस्तूंचे मूल्य यांसारख्या व्यावहारिक गोष्टींचे ज्ञान मिळाले.
मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
या आनंद नगरीचा उत्साह पाहण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, माजी जिल्हा परिषद सभापती मनीष श्रीवास्तव, माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, माजी मुख्याध्यापक अजहर पठाण आणि प्रा. संग्राम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
एपीआय संतोष माने यांनी सांगितले की, मुलांमध्ये लहानपणापासूनच व्यावसायिक धडे रुजवणे ही काळाची गरज आहे. केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द यातून निर्माण होईल.
प्रा. संग्राम देशमुख व परमेश्वर लोखंडे यांनी आयोजकांचे कौतुक करत म्हटले की, बालवयातच गणित आणि व्यवहाराची बेरीज-वजाबाकी शिकण्यासाठी हा मोका अत्यंत महत्त्वाचा आहे.
पालक-शिक्षक समन्वयाची गरज
कार्यक्रमादरम्यान अजहर पठाण व परमेश्वर लोखंडे आदी मान्यवरांनी पालकांच्या प्रतिसादाबद्दल मते मांडली. शाळेची प्रगती ही गावकरी आणि शाळा यांच्यातील समन्वय आणि सहकार्यावर अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी अशा उपक्रमांना अधिक उत्साहात पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शिक्षणातून उद्योजकतेकडे वाटचाल
मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून, जिल्हा परिषद शाळांचा हा बदललेला चेहरा राज्यासाठी निश्चितच दिशादर्शक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.



