जालना जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’: सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता, प्रशासनाकडून दक्षतेचं आवाहन!
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’: सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता, प्रशासनाकडून दक्षतेचं आवाहन!
जालना, दि. १०: हवामान विभागाकडून जालना जिल्ह्यासाठी १० आणि १४ जून २०२५ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ४०-५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
काय काळजी घ्याल?
सुरक्षित ठिकाणी रहा: मेघगर्जना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नका. विजांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर: गडगडाटी वादळ आणि विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळा.
वाहनांपासून सुरक्षित अंतर: ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर रहा.
मोकळ्या जागेत खबरदारी: मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी किंवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नका.
लटकत्या तारांपासून दूर: सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणाऱ्या/लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहा.
विजेपासून संरक्षण: विजा चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाका आणि आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाका. जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवा.
शेतकऱ्यांसाठी सूचना: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावं. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असल्यास किंवा तसं नियोजन केलं असेल, तर मालाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
जनावरांची काळजी: जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना वादळी वारे आणि विजेपासून स्वतःसह जनावरांचं संरक्षण होईल यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (दूरध्वनी: ०२४८२-२२३१३२) तसेच नजीकचे तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असंही त्यांनी नमूद केलं आहे.