जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट: वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट: वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
जालना, दि. २६ ऑगस्ट: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, जालना जिल्ह्यात २७ ते २९ ऑगस्टदरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (ताशी ३०-४० किमी वेगाने) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ३० ऑगस्ट रोजीही हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी: १) विजा आणि वादळापासून बचाव: विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळा.
२) सुरक्षित अंतर राखा: ट्रॅक्टर, शेतीची अवजारं, मोटारसायकल, टॉवर्स, खांब, धातूचं कुंपण आणि लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर राहा.
३) मैदानात असल्यास: जर तुम्ही मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून हाताने कान झाका आणि डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवा. जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवा.
४) सुरक्षिततेची जाणीव: धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका.
शेतकऱ्यांसाठी सूचना: १) शेतीमालाचं संरक्षण: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवा.
२) बाजार समितीतल्या मालाची काळजी: जर तुम्ही शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला असेल, तर तो सुरक्षित ठेवण्याची योग्य ती काळजी घ्या.
३) जनावरांचं स्थलांतर: जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा.
सर्व नागरिकांनी वादळी वारे आणि विजांपासून स्वतःचं आणि जनावरांचं संरक्षण करावं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही जालना येथील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४८२-२२३१३२ या क्रमांकावर किंवा जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकता, असं निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितलं आहे.