
जालना जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट
जालना, दि. २९: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जालना जिल्ह्यामध्ये दिनांक ३० एप्रिल, २०२५ आणि १ मे, २०२५ रोजी उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्हा प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य धोके लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना, गणेश महाडिक यांनी केले आहे.
खबरदारीसाठी सूचना:
• जास्त वेळ उन्हात फिरणे टाळा.
• पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.
• हलके आणि सुती कपडे वापरा.
• उन्हाळ्यात शक्य असल्यास घरातच थांबा.
• वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
• दमट हवामानामुळे अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.