रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देणार: आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्वाही
By तेजराव दांडगे

रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देणार: आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्वाही
जालना दि.22 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मोतीबिंदू आजारावर मात करण्यासाठी या अभियानाचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी सर्व आरोग्य विभाग तत्पर राहील. रुग्णांना उच्चतम दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी केले.
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.22 जुलै 2025 रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन कानोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आदि उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू कक्षाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मनोरुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच कार्यान्वित होईल.प्रत्येक रुग्णाला उच्चतम सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर राहील. असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.