जनावरांना ‘लंपी’पासून वाचवण्यासाठी पारधमध्ये लसीकरण मोहीम
By तेजराव दांडगे /कृष्णा लोखंडे

जनावरांना ‘लंपी’पासून वाचवण्यासाठी पारधमध्ये लसीकरण मोहीम
पारध, दि. १५ : जनावरांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या ‘लंपी’ (Lumpy Skin Disease) आजाराला रोखण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे एक प्रभावी लसीकरण मोहीम राबवण्यात आली, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थानिक युवक सागर देशमुख यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू झाली. याबद्दलची माहिती पारध येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक राजेंद्र फुके यांनी दिली. पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर जाऊन बैल, गायी आणि वासरांना लस दिली.
पशुधन पर्यवेक्षक डॉ. राजेंद्र फुके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि या रोगाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी हे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे होते.
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी उमेश ताजी, दत्तू वनारसे, शेख साकिब, डॉ. अमोल लोखंडे आणि डॉ. संतोष कोथलकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा लसीकरण कॅम्प व्यवस्थित पार पडला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.