पारध उर्दू जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची बिनविरोध पुनर्रचना; मुस्ताक पठाण यांची अध्यक्षपदी तर जुबेर शेख यांची उपाध्यक्षपदी निवड
By तेजराव दांडगे/कृष्णा लोखंडे

पारध उर्दू जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची बिनविरोध पुनर्रचना; मुस्ताक पठाण यांची अध्यक्षपदी तर जुबेर शेख यांची उपाध्यक्षपदी निवड
पारध, दि. २२ (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रें. केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारध उर्दू येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पठाण मुस्ताक सरदार यांची अध्यक्ष म्हणून, तर शेख जुबेर यावर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या दुसऱ्या वर्षासाठी हा बदल सर्वानुमते करण्यात आला आहे.
निवड प्रक्रिया आणि सत्कार
शाळेत ९ डिसेंबर २०२४ रोजी स्थापन झालेल्या या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. पहिल्या वर्षी अध्यक्ष म्हणून शेख सलीम मोईन आणि उपाध्यक्ष म्हणून शेख अकील मोहम्मद यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, नवीन निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडीप्रसंगी प्राथमिक शिक्षक संघ जालनाचे जिल्हा नेते अजहर खान पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते माजी तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (पेन व वह्या) आणि फळांचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन
नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि समिती यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केले. शाळा सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर या सभेत भर देण्यात आला.
उपस्थित मान्यवर
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सदस्य याकूब पठाण, शेख मोहसीन, अस्लमबाबू पठाण, शेख अजीम, शेख इमरान, शेख सलीम, शेख नसीम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक झेड. एफ. कुरेशी व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार तेजराव दांडगे आणि कृष्णा लोखंडे यांचीही उपस्थिती होती.








