दुर्दैवी घटना: विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; मोहळई शिवारातील घटना
By गौतम वाघ

दुर्दैवी घटना: विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; मोहळई शिवारातील घटना
पारध, दि. १९ (जालना): भोकरदन तालुक्यातील मोहळई येथील एका ३० वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना रमेश शिंदे (वय ३० वर्ष, रा. मोहळई, ता. भोकरदन) असे मृत महिलेचे नाव आहे. दिनांक १८/१२/२०२५ रोजी सायंकाळी ४:५० वाजेपूर्वी ही घटना मौजे मोहळई शिवार मधील गट क्र. १२९ येथील द्वारकाबाई शिंदे यांच्या शेतातील विहिरीत घडली. अर्चना शिंदे यांचा विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाला.
पोलीस कार्यवाही:
या घटनेबाबत मयताचे नातेवाईक भागवत रामदास शिंदे (वय ४६ वर्ष) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. मयतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज १९ डिसेंबर रोजी ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यावरून पारध पोलीस ठाण्यात आ.मू.नं. ४२/२०२५, कलम १९४ बीएनएस (BNS) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पारध पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहळई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



