पोळा सणाच्या दिवशी पारधमध्ये दोन घटना; पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई
By तेजराव दांडगे

पोळा सणाच्या दिवशी पारधमध्ये दोन घटना; पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई
जालना, (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावात पोळा सण सुरू असतानाच जुन्या भांडणाच्या कारणावरून तणाव निर्माण झाल्याची बातमी आहे. गावात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये फिर्यादींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पहिली घटना: तरुणाला मारहाण
शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता गावातील रहिवासी ऋषीकेश रमेश सपकाळ यांना त्यांच्या घरासमोर काही आरोपीतांनी अडवून मारहाण केली. ऋषिकेशने दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या वादावरून आरोपीतांनी त्यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारले. एका आरोपीताने हातातील काठीने ऋषिकेशच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले.
दुसरी घटना: बस स्टँडवर हाणामारी
या घटनेच्या काही तासांनंतर रात्री ८ वाजता दुसरी घटना घडली. गावातील पवन गुलाबराव लोखंडे आणि त्यांचा मित्र अक्षय तेलंग्रे यांना पारध बस स्टँडवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काही आरोपीतांनी अडवले. पवन लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणावरून वाद घालत आरोपीतांनी दोघांना मारहाण केली. एका आरोपीताने फायटरने पवनच्या नाकावर मारून त्याला जखमी केले, तर दुसऱ्याने अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला गंभीर दुखापत केली. यावेळी आरोपीतांनी तलवारीने जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर पारध पोलीस ठाण्यात धाव घेऊन ऋषीकेश रमेश सपकाळ यांनी 1) आकाश रवि देशमुख 2) चेतन सुनिल देशमुख 3) स्वप्निल रवि देशमुख 4), गणेश शाम क्षिरसागर सर्व रा. पारध बु ता. भोकरदन जि. जालना यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दोन्ही फिर्यादीच्या तक्रारीनुसार पारध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. नेमाने पुढील तपास करत आहेत. गावातील शांतता बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई:
पोळ्यासाठी बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांमध्ये वेशीच्या आतील परिसरात किरकोळ वाद झाला. यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असतानाच, स्थानिक पोलीस अधिकारी संतोष माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ‘सिंघम’ स्टाईलमध्ये लाठीचा वापर करून गर्दी पांगवली आणि दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले. पोलिसांनी तात्काळ पावले उचलल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सध्या गावात शांतता असून, दोन्ही प्रकरणांतील आरोपीतांचा शोध पोलीस घेत आहेत.