पारदर्शकतेची पाहणी! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रांना अचानक भेट
By तेजराव दांडगे

पारदर्शकतेची पाहणी! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रांना अचानक भेट
जालना, दि. १२: जालना जिल्ह्यात आज पोलीस पाटील भरती २०२५ साठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षा शांततापूर्ण आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि गैरप्रकारमुक्त अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी स्वतः काही परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली.
जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गातील एकूण ७२४ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जालना उपविभाग (१८५), भोकरदन उपविभाग (२४२), अंबड उपविभाग (२५१) आणि परतूर उपविभाग (२०४) येथील पदांचा समावेश आहे. यासाठी आज एकूण २४ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली, ज्यात तब्बल ७८४३ उमेदवारांनी परीक्षा दिली.
जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालय आणि डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय या दोन महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांना भेट देऊन तेथील तयारीचा आणि व्यवस्थेचा बारकाईने आढावा घेतला. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुरळीत व्हावी, यावर त्यांनी भर दिला.
या भरतीसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक आणि भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि तांत्रिक पथक यांनी उत्कृष्ट समन्वय आणि कार्यक्षमता दाखवल्यामुळे परीक्षा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली. कोणत्याही केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जालना प्रशासनाच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ही महत्त्वपूर्ण भरती परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.