पारध परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस; शेतपिकांचे नुकसान
By तेजराव दांडगे

पारध परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस; शेतपिकांचे नुकसान
पारध, दि. 03: भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात काल रात्रभर आणि आज दुपारच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटाने आणि विजेच्या कडकडाटाने रात्रभर गावातील वातावरण भयभीत झाले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतीची कामे विस्कळीत झाली.
रात्री अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्रभर झालेल्या आणि आज दुपारून झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, या भागांत रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आणि आज आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने तसेच वादळी वारे असल्याने मका उभ्या झोपल्या गेल्याने मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने दि. 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान येलो अलर्ट जारी केला असून आज चा दिवशीही असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.