जालन्यातील पारध बुद्रुक शाळेच्या गेटचे काम निकृष्ट, माजी सभापती परमेश्वर लोखंडेंचा इशारा
By तेजराव दांडगे - ( पारध बुद्रुक शाळेचं गेट सात दिवसांत कोसळलं, ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!)

जालन्यातील पारध बुद्रुक शाळेच्या गेटचे काम निकृष्ट, माजी सभापती परमेश्वर लोखंडेंचा इशारा
पारध, दि. १९: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणाच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जवळपास १२ लाख रुपये खर्चून बांधलेल्या शाळेच्या कंपाऊंड वॉल आणि गेटच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचं समोर आलं आहे. विशेषतः शाळेचं गेट इतकं निकृष्ट आहे की ते लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे.
माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की हे गेट केवळ सात दिवसांतच कोसळलं. सुदैवाने त्यावेळी शाळेत कोणीही लहान मुलं नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्यांनी या निकृष्ट कामासाठी ठेकेदार किंवा संबंधित एजन्सीला जबाबदार धरलं असून, तात्काळ हे काम मार्गी लावून त्या ठिकाणी सुरक्षित स्लायडिंग गेट बसवण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित लक्ष दिलं नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने यावर तोडगा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याच संदर्भात शालेय समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ठेकेदाराच्या कामगारांनी काम नीट न केल्यामुळे हे गेट कोसळल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जर त्यावेळी एखादं बाळ तिथे असतं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असं त्यांनी नमूद केलं. या गेटचं काम पुन्हा येऊन चांगल्या पद्धतीने करून द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामस्थ हमीद खा पठाण यांनी या कामावर थेट प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितलं की, जेव्हा मिस्त्री काम करत होते, तेव्हा ते गेट बसवण्यासाठी घणाचा वापर करत होते. मटेरियलऐवजी घणाने ठोकल्यामुळे भिंतीचे तुकडे हातानेच निघत होते. त्यांनी कामगारांना याबद्दल विचारले असता, त्यांना जसे सांगितले आहे, तसेच काम करत आहोत असं उत्तर मिळालं. या गेटमुळे शाळेत खेळणाऱ्या मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले असून, ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची आणि लवकरात लवकर सुरक्षित गेट बसवण्याची मागणी जोर धरत आहे.