पत्रकारांसाठी तंत्रज्ञानाचा मंत्र: जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा मोलाचा सल्ला!
By तेजराव दांडगे ( जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन )

पत्रकारांसाठी तंत्रज्ञानाचा मंत्र: जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा मोलाचा सल्ला!
पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
जालना, दि.22 : आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन कामकाजात उपयोग करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात आज जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल तर प्रमुख मार्गदर्शक जालना येथील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदिप काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील (संगायो) विभागाच्या तहसिलदार श्रीमती प्रणाली तायडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात एआयचा मोठ्या प्रमणात वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पत्रकारांनी देखील नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आज काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाला आज बातमी लवकरात-लवकर हवी असते. परंतू कोणतीही बातमी प्रसिध्द करण्यापुर्वी पत्रकारांना त्याची सत्यता देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज मोबाईल आणि एआयच्या युगामध्ये प्रत्येकाकडे बातमी असून, प्रत्येक व्यक्ती हा बातमीचा कन्टेंट तयार करु शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पत्रकारितेवर अनेक प्रमुख मार्गांनी परिणाम करत आहे. त्यामुळे एआयचा वापर कशा प्रकारे करावा हे पत्रकारांनी समजावून घेणे आवश्यक आहे.
तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणा सर्वांना विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागत आहे. याकरीता आज आपणास जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दोन महत्वाच्या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार असुन, या प्रशिक्षणाचा आपणास नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होणार असल्याचे ही डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले.
पोलीस अधिक्षक श्री. बन्सल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एआयचा वापर चांगल्यारितीने केल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात निश्चितच फायदा होणार आहे. सध्या पत्रकारितेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी होत असून, वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जात आहे. नियमित रिपोर्टिंग स्वयंचलित करून, येणाऱ्या समस्या जलद गतीने कमी करून कृत्रिम बुद्धिमत्ता सद्याच्या पत्रकारितेवर परिणाम करत आहे. परंतु एआयचा वापर करतांना पत्रकारांनी बातमीची खात्री करुन घेणे देखील आवश्यक आहे .
कार्यशाळेत प्रा. संदीप काळे आणि श्रीमती प्रणाली तायडे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन
माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रकार कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदीप काळे यांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारीता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तर तहसिलदार (संगायो) श्रीमती प्रणाली तायडे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर पत्रकारांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.
प्रा. काळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारीतेमध्ये कशा पध्दतीने वापर करावा. तसेच सायबर सुरक्षा, डिपफेक, व्हिडिओ एडिटींग करणे, व्हिडिओ-ऑडीओ मजकूर रुपांतरीत करणे, भाषांतर, सादरीकरण तयार करणे, विविध अहवाल तयार करणे, ग्राफिक्स डिझाईन, विविध भाषेचा योग्य वापर आणि सायबर सुरक्षा आदी बाबत यावेळी मार्गदर्शन केले.
तसेच तहसिलदार प्रणाली तायडे ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणास विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागते. बदलते कामाचे स्वरूप, बदलती कुटूंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदलेले नियम आणि सोशल मिडिया या सर्वांचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहेत. या वाढत्या ताण-तणावावर आपण नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी ताण-तणावांचे योग्य व्यवस्थापन करुन आपल्या जीवनशैलीत योग्य बदल घडविल्यास आयुष्य आनंदाने जगता येते.
जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालय विभागामार्फत पत्रकारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या योजनेचे पात्रता, निकष आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती दिली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले. तर मिलींद तुपसमिंद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु जायभाये, संतोष पाखरे, श्रीमती प्रतिभा इंगळे, ज्ञानोबा पांचाळ यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.