हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!
Target of planting 10 crore trees for a green Maharashtra!

हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मुंबई येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली. यंदाच्या वर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, पुढील वर्षीही एवढ्याच प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी 33 कोटी व 50 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाचे उद्दिष्टही पूर्ण करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ होणे आवश्यक असून, सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोपांचे वय किमान दीड ते तीन वर्ष असावे आणि ती झाडे टिकून राहण्यासाठी कृती केली पाहिजे. वृक्षसंवर्धनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून कामात पारदर्शकता आणावी. ‘कॅम्पा’ निधीचा उपयोग वृक्षारोपणासाठी प्रभावीपणे करावा.
राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग, तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षलागवडीची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपवली जाणार आहे. याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या उद्योगवाढीच्या पार्श्वभूमीवर तेथे 1 कोटी झाडांची लागवड करण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. जोतिबाच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येईल.
बीड आणि लातूरसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये झाडांची संख्या अत्यंत अल्प असल्याने तेथे विशेष वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.