जळगाव सपकाळ शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना आठवीचा अभ्यासक्रम सुरू, उत्साहात वर्गाचे उद्घाटन
By गोकुळ सपकाळ

जळगाव सपकाळ शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना आठवीचा अभ्यासक्रम सुरू, उत्साहात वर्गाचे उद्घाटन
जळगाव सपकाळ, दि. १६: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जळगाव सपकाळ येथे शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना आठवीच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ भाऊ सपकाळ आणि गणेश नाना सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
नियमानुसार शाळा १५ जून रोजी सुरू होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापन सुरू होते. मात्र, आठवीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांच्या विस्तृत अभ्यासक्रमाची तयारी विद्यार्थ्यांना वेळेत करता यावी, या उद्देशाने शाळेने आता उन्हाळ्याच्या सुट्टीतच सातवीच्या विद्यार्थ्यांना आठवीच्या अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नविन वर्गात शिकायला मिळणाऱ्या संधींबद्दल प्रचंड उत्सुकता आणि आनंद दिसून आला. याप्रसंगी उपस्थित पालक आणि शिक्षकांनीही शाळेच्या या निर्णयाचे स्वागत केले. शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक चांगला करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.