ITI प्रवेश प्रक्रिया सुरू: जालन्यातील हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर संस्थेत ४१२ जागा उपलब्ध!
By तेजराव दांडगे

ITI प्रवेश प्रक्रिया सुरू: जालन्यातील हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर संस्थेत ४१२ जागा उपलब्ध!
जालना, दि. ६ जून : राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) शिल्प कारागीर योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२५ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवली जात आहे.
जालना येथील हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ४१२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून २०२५ आहे, तर प्रवेश अर्ज निश्चित करणे आणि संस्थानिहाय व्यवसायांचे विकल्प व प्राधान्यक्रम भरण्याची अंतिम तारीख २७ जून २०२५ आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी ITI Admission Portal: https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या संस्थेमध्ये एकूण १५ विविध व्यवसाय उपलब्ध आहेत, ज्यात फॅशन टेक्नॉलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी, कोपा, डीझेल, संधाता (फिटर), पत्रेकारागीर (शीट मेटल वर्कर), यंत्रकारागीर (मशिनिस्ट), कातारी (टर्नर), जोडारी (वेल्डर), यांत्रिक विजक (मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स), प्रशीतन व वातानुकूलित टेक्नीशियन (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग), आरेखक स्थापत्य (ड्राफ्ट्समन सिव्हिल), यांत्रिक मोटार गाडी (मेकॅनिक मोटर व्हेईकल), विजतंत्री (इलेक्ट्रिशियन), आणि तारतंत्री (वायरमन) यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, महिलांसाठी प्रत्येक व्यवसायात ३० टक्के जागा राखीव आहेत. अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्या रजनी शेळके यांनी केले आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास, संस्थेतील प्रवेश विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.