जालना जिल्ह्यातील शेलुद येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त, पारध पोलिसांची कारवाई
By तेजराव दांडगे

जालना जिल्ह्यातील शेलुद येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त, पारध पोलिसांची कारवाई
जालना, दि. २६ एप्रिल २०२५: भोकरदन तालुक्यातील शेलूद धरणाच्या परिसरात आज पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत पारध पोलिसांनी ४६० लिटर गावठी दारू बनविण्यासाठी तयार केलेले मिश्रण आणि दारू बनवण्याचे साहित्य असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पारध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पारध पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेलुद धरणाच्या बाजूला गस्त घालत असताना त्यांना संशयित ठिकाणी काही हालचाल दिसली. अधिक तपास केला असता, धरणाच्या कडेला एका ठिकाणी दोन प्लास्टिकच्या ड्रममध्ये प्रत्येकी २०० लिटर आणि दोन लहान डब्यांमध्ये प्रत्येकी ३० लिटर असे एकूण ४६० लिटर आंबट आणि उग्र वास असलेले गावठी दारू बनवण्याचे मिश्रण आढळून आले. तसेच, एका काळ्या रंगाच्या लोखंडी ड्रममध्ये २०० लिटर मिश्रण आणि भट्टीसाठी लागणारे साहित्य देखील मिळून आले. या सर्व साहित्याची किंमत सुमारे ६६ हजार रुपये आहे.
पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून इकबाल हुसेन तडवी (रा. शेलुद) नावाचा आरोपीत पळून गेला. याप्रकरणी जिवन रमेश भालके (वय ३१, पोलीस कॉन्स्टेबल) यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि संतोष माने यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ पि. एन. सिनकर हे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर मोठी कारवाई झाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.