अट्टल गुन्हेगार श्रीकांत ताडेपकर अखेर जेरबंद, एका वर्षासाठी स्थानबद्ध! स्थानिक गुन्हे शाखेची थरारक पाठलाग करून कारवाई
By तेजराव दांडगे

अट्टल गुन्हेगार श्रीकांत ताडेपकर अखेर जेरबंद, एका वर्षासाठी स्थानबद्ध! स्थानिक गुन्हे शाखेची थरारक पाठलाग करून कारवाई
जालना, दि. २४ जून २०२५: जालना जिल्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, या मालिकेत आज आणखी एका सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात आले आहे. शरीराविरुद्धचे आणि मालाविरुद्धचे गुन्हे करणारा, तसेच अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये रेकॉर्डवर असलेला श्रीकांत उर्फ शिऱ्या ऋषीकुमार ताडेपकर (रा. सरस्वती मंदिराजवळ, खरपुडी रोड, जालना) याला एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी झाले आहेत.
श्रीकांत ताडेपकर हा तलवार आणि इतर घातक हत्यारांच्या जोरावर विविध गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्थेत बिघाड करत होता. त्याची वाढती गुन्हेगारी पाहता, तात्कालीन प्रभारी अधिकारी तालुका जालना, सुरेश उणवणें यांनी त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मा. जिल्हादंडाधिकारी, जालना यांच्याकडे पाठवला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत आरोपीला महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमानुसार (MPDA) एका वर्षासाठी हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
गेल्या चार महिन्यांपासून श्रीकांत ताडेपकर आपला मोबाईल बंद ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी आपला ठावठिकाणा लपवत होता. पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. मात्र, आज दिनांक २४/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, श्रीकांत ताडेपकर एका वाहनात बसून जालना शहरात आला आहे. या माहितीच्या आधारे शोध घेत असताना, पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे एक ते दीड किलोमीटर पाठलाग करत, त्याला विशाल कॉर्नर, जालना येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर त्याला स्थानबद्धतेच्या कारवाईसाठी पोलीस ठाणे तालुका जालना येथे सुपूर्द करण्यात आले आहे. आता त्याला पुढील एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
जालना पोलिसांनी अशा प्रकारचे गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आरोपींविरुद्ध MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची तसेच हद्दपारीची कठोर कारवाई सुरू ठेवली असल्याचे स्पष्ट केले आहे.
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोउपनि. भगवान नरोडे (पो.स्टे. अंबड), आणि पोलीस अंमलदार विजय डिक्कर, भाऊराव गायके, रुस्तुम जैवाळ, प्रशांत लॉखंडे, फुलचंद गव्हाणे, संभाजी तनपुरे, रमेश काळे, सोपान क्षीरसागर, सचिन राऊत, योगेश सहाणे, धीरज भोसले (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना) यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.