मोठी बातमी! जालन्यात ७० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
By तेजराव दांडगे

मोठी बातमी! जालन्यात ७० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
जालना, २५ जून २०२५: जालना स्थानिक गुन्हे शाखेने ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपीतांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून २०२५ रोजी रवी प्रदीप खोमने (वय ३६, व्यवसाय: संस्था चालक, रा. गांधीचमन, जालना) यांनी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पंकज जाधव यांनी तातडीने पथक तयार करून तपास सुरू केला. २४ जून रोजीच या गुन्ह्यातील आरोपीत करण विलास निकाळजे (वय २५), निलेश रावसाहेब निकाळजे (वय २५, दोघे रा. तांदुळवाडी, ता.जि. जालना) आणि मयूर कुंडलीक निकम (वय २१, रा. कन्हैयानगर, जालना) यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान, आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली टोयोटा ग्लांझा कार (किंमत १० लाख रुपये), ७,९१,५०० रुपये रोख रक्कम, पिस्तूलसारखे दिसणारे लायटर (किंमत १,२०० रुपये), खंडणीच्या पैशांतून खरेदी केलेले १,०७,००० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २,०५,००० रुपयांचा सोनी कंपनीचा फोटोग्राफी कॅमेरा असा एकूण २१,०४,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी या आरोपीतांना चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून, उर्वरित आरोपीतांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, आणि पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, देविदास भोजने, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, तसेच चालक सौरभ मुळे यांचा समावेश होता.