Jalna: खरिपाच्या तोंडावर खाते होल्ड; शेतकऱ्यांची कोंडी
By तेजराव दांडगे

खरिपाच्या तोंडावर खाते होल्ड; शेतकऱ्यांची कोंडी
पारध, दि. 22:- ऐन पेरणीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पीककर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. बँकेने केवळ कर्जदारांचेच नव्हे, तर त्यांना जामीन देणाऱ्यांच्या खात्यांनाही लगाम घातला आहे. बचत खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा होत असले तरी ते काढता येत नसल्याने, गारपिटीचे अनुदान जमा होऊनही शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे. मात्र, पेरणीच्या तोंडावरच बँकेकडून पीककर्ज वसुलीची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पिकांची कापणी होऊन, शेतमाल बाजारात विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येतो, तेव्हा कर्जाची वसुली करणे अपेक्षित असताना, खरीप पेरणीच्या तोंडावरच बँकेने वसुली मोहीम सुरू केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
यावर्षी उष्णतेमुळे उन्हाळी पिके वाया गेली आहेत, तर अनेक भागांत अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या लांबल्या आहेत. सध्या काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या असल्या, तरी खाते होल्डवर असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आजकाल ८० टक्के व्यवहार ऑनलाइन होत असल्याने, खाते होल्डवर ठेवल्यामुळे पैसे असूनही ते काढता येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
पारध परिसरात सध्या मिरची लागवडीची लगबग सुरू असून, यासाठी मोठा खर्च येत आहे. गेल्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात गारपिटीचे अनुदान जमा झाले आहे, परंतु क्रॉप लोन न भरल्यामुळे त्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी केली आहे.
या संदर्भात एसबीआयच्या पारध शाखेचे शाखाधिकारी ए. व्ही. ठाकूर म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ देणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड झाले आहेत, त्यांनी बँकेत येऊन अर्ज करावा. ज्यांच्या खात्यात गारपीट, पीकविमा किंवा शासनाच्या अन्य योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत, त्यांचे अकाउंट त्वरित उघडून त्यांना पैसे काढण्याची मुभा दिली जाईल.”
शेतकऱ्यांनी चुकीच्या वेळी सुरू केलेली सक्तीची वसुली त्वरित थांबवावी, तसेच पीकविम्याची रक्कम खात्यात जमा झाल्यावर ती थेट कर्ज खात्यात जमा करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जामीनदारांना वेठीस धरणे पूर्णपणे बेकायदेशीर असून, बँकेने ही मनमानी थांबवावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. या मागणीचे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख, माजी उपसरपंच समाधान डोईफोडे, अशोक लोखंडे, ज्ञानेश्वर मोरे, अशोक तबडे, विनोद तेलंग्रे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.