जालना पोलिसांनी उघड केले गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट: ५ आरोपीत जेरबंद, ३ पिस्तूल आणि १६ काडतुसे जप्त
By तेजराव दांडगे

जालना पोलिसांनी उघड केले गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट: ५ आरोपीत जेरबंद, ३ पिस्तूल आणि १६ काडतुसे जप्त
जालना, ०४ जुलै २०२५: जालना स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गावठी पिस्तूल खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत अवघ्या तीन दिवसांत ५ आरोपीतांना जेरबंद केले आहे. या कारवाईत त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, पिस्तूल खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी दिनांक ०१/०७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने तातडीने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
०१ जुलै २०२५ रोजीची कारवाई:
पथकाने ०१ जुलै रोजी महेश विष्णू निचळ (वय २६, रा. शिंदे वडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ०१ गावठी पिस्तूल आणि ०६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०२ जुलै २०२५ रोजीची कारवाई:
दुसऱ्या दिवशी, ०२ जुलै रोजी पथकाने अंबड आणि घनसावंगी येथील पाहिजे असलेला आरोपीत समीर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद (वय २१, रा. पानेवाडी, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे (वय ३१, रा. गांधीनगर, जालना) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ०१ पिस्तूल आणि ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या दोघांविरुद्ध सदर बाजार जालना पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०३ जुलै २०२५ रोजीची कारवाई:
आरोपीत समीर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने काही दिवसांपूर्वी प्रवीण विष्णू वायाळ (वय २१, रा. कुंभारझरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे विकली होती. पथकाने प्रवीण वायाळला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने ते पिस्तूल आणि जिवंत काडतुसे दामोदर अण्णा लोखंडे (वय ४०, रा. जाफ्राबाद, जि. जालना) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दामोदर लोखंडेला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली. या तिन्ही आरोपींविरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी, जालना उपविभाग, अनंत कुलकर्णी आणि उप विभागीय पोलीस अधिकारी, अंबड उपविभाग, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, देविदास भोजने, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश राठोड, संभाजी तनपुरे, कैलास खाडे, जगदीश बावणे, दीपक घुगे, रुस्तुम जैवाळ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, अक्रूर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, किशोर पुंगळे, सचिन राऊत, चालक अशोक जाधवर आणि सौरभ मुळे यांनी केली आहे.