निवृत्तीवेतनधारकांनो, सावधान! ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या भूलथापांना बळी पडू नका!
By तेजराव दांडगे

निवृत्तीवेतनधारकांनो, सावधान! ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या भूलथापांना बळी पडू नका!
जालना, दि. १९: निवृत्तीवेतन सुरू करणे, ते बंद करणे, फरकाची रक्कम अदा करणे किंवा जास्त रक्कम वसूल करण्याच्या नावाखाली राज्यातील कोषागार कार्यालयाकडून कोणत्याही निवृत्तीवेतनधारकांना फोन किंवा मोबाईलद्वारे संपर्क साधला जात नाही. तसेच, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नये यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करून फॉर्म भरण्यास सांगितले जात नाही, असे जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोषागार कार्यालयामार्फत कोणतीही व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविली जात नाही. कार्यालयाचे सर्व व्यवहार केवळ पत्रव्यवहाराद्वारेच केले जातात. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनला किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशाला बळी पडू नका, असे आवाहन कोषागार विभागाने केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना ‘फोन पे’, ‘गुगल पे’ किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ऑनलाईन पैसे भरण्यास सांगणारे संदेश पूर्णपणे खोटे आहेत. अशा संशयास्पद दूरध्वनी किंवा मोबाईल संदेशांपासून सावध राहा आणि त्वरित आपल्या जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन कोषागार अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.