तराडखेड ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा अड्डा? लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
By अनिल जाधव

तराडखेड ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा अड्डा? लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
बुलढाणा: जिल्ह्यातील तराडखेड (ता. जि. बुलढाणा) ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सध्या वादाच्या भोवर्यात सापडला आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यांच्या लिलावात तब्बल २३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सद्दाम बेग सुलतान बेग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे २२ डिसेंबर २०२५ रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्रकरण काय आहे?
तक्रारीनुसार, सन २०२१ मध्ये तराडखेड ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीचे ९ व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवली होती. शासकीय नियमानुसार झालेल्या या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना गाळे देण्यात आले. सर्व ९ गाळ्यांची मिळून एकूण २३,००,००० (तेवीस लाख) रुपये अनामत रक्कम (Deposit) गोळा झाली होती.
तक्रारदार सद्दाम बेग यांनी गाळा क्र. १ साठी १,५०,००० रुपये रोख स्वरूपात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे जमा केले होते. सद्यस्थितीत त्यांना हा गाळा रिकामा करून आपली अनामत रक्कम परत हवी आहे. मात्र, ही रक्कम परत मागितली असता सरपंच आणि सचिवांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
गंभीर आरोप आणि अनियमितता
या तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नियमानुसार लिलावातून जमा झालेली २३ लाख रुपयांची ही मोठी रक्कम ग्रामपंचायतीच्या ‘जनरल फंड’ बँक खात्यात जमा होणे आवश्यक होते. मात्र, ही रक्कम सरकारी खात्यात जमा न करता सरपंच, सचिव आणि सदस्यांनी संगनमताने परस्पर हडप केल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
तराडखेड ग्रामपंचायतीत यापूर्वीही भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे “ग्रामपंचायत कार्यालय हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे का?” असा सवाल आता ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
तक्रारदाराची मागणी:
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमण्यात यावी.
दोषी आढळणाऱ्या सरपंच, सचिव आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
सर्वसामान्यांचे हडप केलेले पैसे तात्काळ परत मिळावेत.
आता या गंभीर तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासन काय पावले उचलते आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.



