नाट्य-साहित्य संमेलनात ठसकेबाज अहिराणी भाषेचा केला जागर… युवा नाट्य-साहित्य संमेलनात अहिराणी भाषा ठरली सुप्पर डुप्पर…. युवा नाट्य-साहित्य संमेलन उत्साहात संपन्न.
अतिशय बिनधास्त व्यक्तिमत्व,सामाजिक विचारसरणी उत्कृष्ठ अभिनेता,पर्यावरण व शेतकरी प्रेमी आदी पैलू जितेंद्र जोशी यांचे मुलाखतीतून प्रकट झाले.अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्यगृहात दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजेपासून युवा साहित्य कवीसंमेलनाला सुरवात करण्यात आले. त्यानंतर विविध कार्यक्रमांना सुरवात झाली.
प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी यांनी प्रकट मुलांखतीतून युवा नाट्यकर्मींना संदेश दिला.
कुटुंब लहान असेल आणि गरजा कमी असतील तर जगण्यासाठी फारसे काही करावे लागत नाही पण जगण्या पलीकडे काही करायचे आणि मिळवायचे असेल त्या पलीकडे जाऊन जोमाने आणि जिद्दीने प्रयत्न करावे लागतील,खरेतर नाटक धंदा थोडा बदलत आहे पण पोट नक्कीच भरत आहे,संत ज्ञानेश्वर,तुकोबा राय,छत्रपती शिवराय व पूज्य सानेगुरुजी यासारखी मंडळी आपल्यातुनच घडली, यामुळे कठीण असे काहीच नाही तुम्ही फक्त निसर्गावर प्रेम करा निसर्ग तुमच्यावर प्रेमचं करेल आणि अनेक पिढया तुमच्या जिवंत ठेवेल असा संदेश प्रसिद्ध मराठी सिने अभिनेता जितेंद्र जोशी यांनी प्रकट मुलाखतीतून आजच्या युवकांना दिला.
जळगाव येथील प्रसिद्ध रंगकर्मी शंभू अण्णा पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीतून जोशी यांना बोलते केले,दोन्ही ही महान कलाकार असल्याने मंचावर अक्षरशः रंगतच आली,दुपारी ३ वा मंचावर त्यांचे आगमन झाले,अतिशय बिनधास्त व्यक्तिमत्व, सामाजिक विचारसरणी,उत्कृष्ठ अभिनेता,पर्यावरण व शेतकरी प्रेमी आदी पैलू जितेंद्र जोशी यांचे मुलाखती तून प्रकट झालेत. या दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की ईश्वर निसर्गतच असून त्याच्यावर प्रेम करा,सुरवातीला नट होता येत हे माहीतच नव्हतं,खर तर मी आईचाच मुलगा कारण बाप दारुड्या यामुळे आईने बापाला टाकले,यानंतर पुण्यात आजोबांचा सहारा घेतला,आजोबा गेल्यानंतर मात्र खरां संघर्ष सुरू झाला,७ वी त असताना मामाच्या इलेक्ट्रिक दुकानावर काम केले,संध्यानंद पेपर वाटले,वाईन शॉप ला काम केले,१० वि झाल्यानंतर इंजिनिअरिंग ला जायला साडेतीन हजार रु नव्हते म्हणून शिक्षण सोडले आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुंबईची वाट धरली,पण फार काळ दुखात रमणारा मी माणूस नव्हतोच,सुरवातीला नाट्य कंपनीत टेपर्या म्हणून साऊंड देण्याचे काम केले मात्र एकदा एक कलाकार नसल्याने संधी मिळाली आणि तेथून संधीचे सोन करत प्रसिद्ध नट म्हणून घडलो असे सांगून प्रेक्षक हा कुणाचाच नसतो तो फक्त स्वतःचाच असतो मी आजही परिपूर्ण अभिनेता स्वतःला समजत नाही असे आवर्जून त्याने सांगितले व शेवटी अति जागृत पालक हेच मुलाचे अडसर असतात,लहान पणी भरपूर खेळा, पुरुष मंडळींनी घरची कामे करा,स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि जगण्या पलीकडे काही मिळवायचं असेल त्या पलीकडे जाऊन जोमाने प्रयत्न करा संदेश त्याने दिलेत.
कविसंमेलन…..…
“हिरव्या स्वप्नांच्या कत्तली..आतून पोखरत राहतील”
असा चिंतनशील सूर व्यक्त करणाऱ्या कवितेच्या विश्वात युवा कवींच्या प्रगल्भ जाणिवा व्यक्त करणाऱ्या कवितांनी युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात जोरदार ठरली.
बाप कविते ने प्रसिध्द झालेले कवि रमेश धनगर यांनी नवोदित कविना आजच्या कवी संमेलनातून खुलते केले.
काव्यसंमेलनाचे अध्यक्ष पाचोरा येथिल कवी कृपेश महाजन हे होते. वारंवार समोर येणाऱ्या कवितांमुळे सोशल मीडियातून कवितांचा खेळ मांडला की काय असा गंभिर प्रश्न काव्य विश्वापुढे निर्माण झाला असल्याचे कृपेश महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.
युवा साहित्यिक काव्याला समृद्ध करतांना आपल्या अनुभव विश्वाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात याचा प्रत्यय या कवि संमेलनातून आला.
गणेश राऊत यांनी चिंतनशील काव्यातून प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला तर प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी गावगाडा,रापी, या कविता सादर करतांना बापाच्या व्यथाही काव्यातून मांडल्यात.कु.तेजल भावसार हिची तरल भावभावना असलेली ‘लयतत्व’ कविता टाळ्या घेऊन गेली. आजच्या युगातील ताणतणाव मांडणारा मोठा काव्यप्रपंच कु.भूमिका घोरपडे हिने मांडला. कमी वयातही “जगावं तर कसं जगावं”असा यक्ष प्रश्न भूमीका हिने कवितेतून उपस्थित केला आणि टाळया मिळविल्यात. मुक्तछंदाची अंतरलय सापडलेला युवा कवी सारांश सोनार याने आपल्या उपस्थित रसिकांची दाद मिळविली.
शैलेश चव्हाण यांनी व्यथाना सुंदर तरी कसे म्हणावे असा प्रश्न उपस्थित करीत शेतीमतीची कविता सादर केली. सदाशिव सूर्यवंशी यांनी ‘वावर म्हा’ ही कविता लक्षवेधी ठरली.
अहिराणी परिसंवाद….युवा नाट्य-साहित्य संमेलनात ठसकेबाज अहिराणी भाषेचा केला जागर…
खान्देशी लोकसाहित्य हे अस्सल अहिराणीतील साहित्य असून आपण आपली संस्कृती जतन करायला हवी तरच अहिराणी ला मानपान मिळेल.असा
युवा नाट्य साहित्य संमेलनातील अहिराणी भाषेचा जागर साहित्यिककानीं अहिराणी भाषेचा केलेला जागर उपस्थितांना हसता हसता चिंतन करायला लावणारा आणि अस्सल मायबोलीची मेजवानीच ठरला. ठसकेबाज आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अहिराणी भाषेतील परिसंवाद युवा नाट्य संमेलनातील साहित्यिक मेजवानीचा कळस ठरला. रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः उभे राहून खान्देशी अहिराणी साहित्यिकांना टाळ्या वाजवत उत्स्फूर्त सलामी दिली.
“खांदावर मनी जत्रा चालनी…तू यी जाय कानी कानी”-सुदाम महाजन (तहसिलदार)अहिराणी साहित्यिक आणि तहसीलदार सुदाम महाजन यांनी “खांदावर मनी जत्रा चालनी…तू यी जाय कानी कानी” या कवितेतून अहिराणी भाषेच्या लकबी मांडतांना सुमधुर लयबद्ध कवितांचे सादरीकरण केले.यावेळी त्यांनी भाषेतून व्यक्त केलेला अहिराणी बाज उपस्थितांच्या जोरदार टाळ्या घेऊन गेला.
‘आयत पोयत संख्यान’
हा प्रयोग प्रविण माळी यांनी या परिसंवादात सादर करून रसिक श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या मिळविल्यात. सूरत पासून बऱ्हाणपूर अहिराणीचे साम्राज्य आहे असे सांगताना “जठलोग मनी माय माऊली घटयावर दयन दयी र्हायनी तथलॉंग अहिरणी ले धोका नही शे.! “असा विश्वास व्यक्त केला. अहिराणी भाषेचे दर कोसावर बदलत जाणारे वैशिष्ट्य आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले.
“तोंडाय अक्का”
प्रा.योगिता पाटील यांनी अहिराणी भाषेच्या आणि स्त्री संस्कृती चा मिलाफ रसिकांसमोर मांडताना श्रोत्यांना चिंतनशील केले.
आपल्या खुमासदार शैलीतून दाभाडी चे डॉ. एस.के.पाटील यांनी अहिराणीतुन ग्रामिण संस्कृतीचे आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले तर अहिराणीचे वैभव हे आपल्या रोजच्या बोलीतून वाढले पाहिजे अहिराणी संस्कृती जतन करण्यातूनच टिकून राहील.असे विवेचन केले.
परिसंवाद- युवकांच्या भावविश्वातील नाट्य व साहित्य.. युवकांमधील नैराश्य हे कलेने दूर होऊ शकते.
युवकांमधील उर्मी व्यक्त करण्यासाठी कलेचे सादरीकरण हा उत्तम मार्ग आहे.युवा नाट्य साहित्य संमेलनाचे समारोप पूर्व परिसंवादात उमटलेला युवकांच्या भाव विश्वाचा कलात्मक अंगाने वेध घेतला गेला. भावविश्व कोलमडलेल्या युवा पिढीतील युवकांना व्यक्त होण्यासाठी,प्रकट होण्याकरिता संधी मिळाली पाहिजे… अन्यथा संधीच्या शोधात युवकांना विस्थापित होण्याची वेळ येते अशी खंत मोल चित्रपटातील अभिनेता योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. अभिनेता व दिगदर्शक योगेश कुलकर्णी यांनी मोल चित्रपट रसिकांनी मनापासून स्वीकारल्याबद्दल आंनद व्यक्त करत महाविद्यालयात पातळीवर तरुणांना कला क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
——————–
आजच्या पिढीत मोठ्याप्रमाणात होणारे स्थित्यंतर हे सुप्त स्वरूपात आहे.खान्देशी मातीत केवळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नात्याचळवळ कधी काळी चालायची मात्र आता बदलत्या काळात संधीचे दालन सर्वत्र उघडलेले आहे!
———————
युवकांच्या भावविश्वातील नाट्य व साहित्य या विषयावर सम्पन्न झालेल्या परिसंवादात “शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला” चे लेखक व अभिनेता राजकुमार तांगडे यांनी युवकांनी आपल्या भावविश्वाचा वेध घेताना आसपासच्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी संवेदनशील मनाने टिपून त्या भूमिकेतून व्यक्त झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
——————-
अभिनेत्री मंजुषा भिडे यांनी मोबाईल, इंटरनेटच्या युगात तरुण वाचन, चिंतन व त्यातून येणाऱ्या अभिव्यक्ती पासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
—————-
नॅशनल अवार्ड विजेत्या “भर दुपारी” या शॉर्ट फिल्मचे दिगदर्शक स्वप्नील कापुरे यांनी वेदना व संवेदना कलेच्या माध्यमातून मांडणे हेच खरे आव्हान असल्याचे मत व्यक्त केले.
————–
परिसंवादाचे अध्यक्ष शरदचंद्र जाधव यांनी खऱ्या सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांना भिडणाऱ्या कलाकृती निर्माण होणे ही आजची खरी गरज असल्याचे मत मांडले. तर परिसंवादाच्या शेवटी मातीत रुजलेली व मनातून फुटलेली अस्वस्थ तरुण मने समाजाच्या भावविश्वाला आकार देऊ शकतात असे मत सूत्रसंचालक प्रा लिलाधर पाटील यांनी मांडले.
युवा नाट्य संमेलनात जीवनाचा दृष्टीकोन देणारा कार्यक्रम –राजेश पांडे.
साहित्य संमेलनाचा समारोप, विविध रंगकर्मींचा गौरव.जीवनाचा दृष्टीकोन देणारा असा हा कार्यक्रम आहे असे मत राजेश पांडे यांनी येथील सायंकाळी युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या समारोपात केले. रविवारी या संमेलनाचा समारोप झाला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम झाले व सायंकाळी समारोप सत्रात ते बोलत होते.यावेळी संमेलन चे अध्यक्ष हर्षल पाटील, स्वागताध्यक्ष डिंगबर महाले, शंभू पाटील, गिरीश पाटील, राजेश पांडे, तानसेन जगताप,संदीप घोरपडे, दिलीप पाटील, रमेश पवार, सुनीता राजे पाटील, नरेंद्र निकुंभ,रमेश पवार, शरद सोनवणे यांच्या सह मसाप चे कार्यकारणी सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी दिलीप पाटील यांनी, गिरीश पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यीक कृष्णा पाटील, रंगकर्मी संतोष पाटील,शिरसाठ गुरुजी, नरहरी बोरसे, जळगाव अपर्णा भट, पियुष रावल, मनोज टाकणे, योगेश पाटील, डॉ अमोघ जोशी, योगेश संदनशिव, संदीप पाचंगे,नितीन शहा, प्रा विनय जोशी आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. युवा नाट्य साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी रणजित शिंदे, भाऊसाहेब देशमुख, गोकुळ बागुल, दिनेश नाईक,संजय चौधरी, प्रा रमेश माने, निरंजन पेंढारकर, प्रा लीलाधर पाटील, दिलीप सोनवणे, विजया गायकवाड,
माधुरी पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. यावेळी उमवि व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजेश पांडे – अमळनेर शहरात सांस्कृतिक ऊर्जा आहे, त्या उर्जेला संधी मिळाली पाहिजे, हे संमेलन म्हणजे गावातील तरुणाच्या विकासाला चालना देणार आहे. शहरात कार्यक्रम करा आवश्यक ती मदत सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळवू असे आश्वासन दिले. भारत हा तरुणाचा देश आहे, या तरुणाई ला दिशा मिळाली नाही तर देशासाठी लाभांश राहील की नुकसान कारक ठरेल. जगाला माणसे पाहिजे त,आणि भारतातीळ तरुणाई काम पाहिजे, अशा कार्यक्रमातून तरुणाई दिशा द्या असे पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले.
.