वाढोणा येथे 61,200 किमतीचा गांजा जप्त, एकाला अटक
By तेजराव दांडगे

वाढोणा येथे 61,200 किमतीचा गांजा जप्त, एकाला अटक
पारध, दि. 03 : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे 61,200 रुपये किमतीचा 3 किलो 60 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी गोटीराम हरसिंग लोधवाल यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज, दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 1:50 वाजता पारध पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, मौजे वाढोणा शिवारात, शेतगट क्रमांक 138 मधील आरोपीत गोटीराम हरसिंग लोधवाल याच्या राहत्या घराशेजारी बेकायदेशीरपणे गांजाची लागवड आणि संगोपन केले जात आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. छापा टाकल्यावर, पोलिसांना 3 किलो 60 ग्रॅम वजनाची, हिरवी आणि अर्धवट सुकलेली गांजाची झाडे मुळासह आढळून आली. तसेच, काळसर रंगाची माती ज्यात गांजाच्या झाडाचे मूळ होते, ती देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 61,200 रुपये आहे.
याप्रकरणी, प्रदीप ज्ञानदेव सरडे, वय 50 वर्ष, पो.हे.काँ. पोलीस ठाणे पारध यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत गोटीराम हरसिंग लोधवाल, रा. जनुना ता. बुलढाणा (हल्ली मुक्काम कालिकादेवी रोडजवळ वाढोणा) यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. माने हे करत आहेत. आरोपीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या मादक पदार्थ गांजाची लागवड करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.