‘नुतन वसाहत’ खून प्रकरणातील मुख्य आरोपीत नाशिकमधून जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; घटनेनंतर काही तासांतच आरोपीत ताब्यात
By तेजराव दांडगे

‘नुतन वसाहत’ खून प्रकरणातील मुख्य आरोपीत नाशिकमधून जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; घटनेनंतर काही तासांतच आरोपीत ताब्यात
जालना/प्रतिनिधी: जालना शहरातील ‘नुतन वसाहत’ येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील एका मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने नाशिक येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून झालेल्या या गंभीर गुन्ह्यातील आरोपीताच्या तात्काळ अटकेमुळे जालना पोलिसांनी कौतुकास पात्र ठरले आहे.
काय आहे प्रकरण?
जालना शहराच्या नुतन वसाहत येथील रहिवासी विकास प्रकाश लोंढे हे लग्नावरून घरी परतत असताना, गुन्ह्यातील आरोपींनी संगनमत करून त्यांना रस्त्यात अडवले. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना प्रथम जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्यांचा खून केला होता.
LCB ची तांत्रिक विश्लेषणानुसार कारवाई:
सदरची घटना घडताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आरोपींच्या शोधात लागले. तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय खबरदारीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपीतांपैकी एक जण नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात थांबलेला आहे.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणतीही वेळ न दवडता त्वरित नाशिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. आरोपीताच्या वास्तव्याचे ठिकाण निश्चित करून, एका खाजगी वाहनाने तात्काळ नाशिक येथे धाव घेतली आणि आरोपीतास ताब्यात घेतले.
यांनी केली यशस्वी कारवाई:
सदरची ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि सचिन स्वाममळ, पोउपनि राजेंद्र वाघ, सपोउपनि रामप्रसाद पव्हरे, पोहवा प्रभाकर वाय, रमेश राठोड, ईरशाद पटेल, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, आणि रमेश काळे यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली.



